
विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शिष्टाचार पाळावा, नाहीतर त्यांना तो विधानसभेच्या अध्यक्षांनी पाळायला लावावा, अशी टीका आ. रोहित पवार यांनी केली. त्यावर भाजपाचे तालुका सरचिटणीस पप्पूशेठ धोदाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

धोदाड यांनी म्हटले आहे, विधानसभा निवडणुकीत करोडो रूपयांचा चुराडा करून देखील केवळ हजार मताच्या फरकाने विजय मिळाल्यामुळे आ. रोहित पवार यांना राजकीय विकलांगता आली आहे. मानहानीकारक रितीने मिळालेल्या विजयाने त्यांना राजकीय आणि सार्वजनिक जीवनात पूर्णपणे आणि प्रभावीपणे सहभागी होण्यास अडचणी जाणवताना दिसत आहेत. मानसिक दृष्ट्या व्यथित झालेले आमदार महोदय याच विकलांग वृत्तीने सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर विनाकारण टीका टिप्पणी करत आहेत. सभापती प्रा.राम शिंदे यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात कसे वागावे आणि कसे जगावे याची त्यांना चांगली माहिती आहे.

सर्व प्रथम त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राजशिष्टाचार मंत्री म्हणून काम केलेल्या आणि विधानपरिषदेचे सभापती असलेल्या व्यक्तीच्या चुका काढण्याईतपत आपण ज्ञानी आहोत का हे तपासले पाहिजे. विधानसभा निवडणुकीत प्रसिद्धी माध्यमांवर जाहीररित्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला अरेरावी आणि शिवराळ भाषा करणाऱ्यांना राजशिष्टाचार काय असतो हे समजते का ? हे देखील तपासले पाहिजे. खर तर प्रा. राम शिंदे हे राजकीय पटलावरील ‘सत्वगुणी’ सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व आहे. राजकारणात अशा प्रकारची फार थोडी लोक असतात त्यापैकी प्रा. राम शिंदे हे एक आहेत. जय पराजय पचवण्याची अद्भुत क्षमता त्यांच्यात आहे. त्यांनी कधीही कोणा विषयी आकस किंवा सूडबुद्धी बाळगली नाही म्हणून सत्ता असो वा नसो त्यांच्या भोवती नेहमीच जनसामान्यांचा गराडा असतो. विधानपरिषदेच्या सभापतीपदी विराजमान झाल्यानंतर देखील त्यांनी जनतेची नाळ तुटू न देता सामान्य लोकांच्या हाकेला ओ देण्यात धन्यता मानली आहे. याच गोष्टींचा धसका रोहित पवार यांनी घेतला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारची बेछूट वक्तव्य रोहितदादा पवार यांच्या तोंडुन येत आहेत.

प्रा. राम शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख खुप मोठा आहे. त्यांना मिळालेले पद हे घराणेशाही च्या वारसाहक्काने कींवा आज्या- चुलत्यांच्या आशिर्वादाने मिळाले नाही. तो त्यांच्या योग्यतेचा झालेला सन्मान आहे. आपणाला मिळालेली काठावरील आमदारकी ही घराणेशाहीचा युवराज वाचावा म्हणून काकांनी केलेला घात आहे. रडीचा डाव खेळून त्या हजार मतांनी विजयी संपादन केलेल्या आमदारांनी आणि तुकडे झालेल्या आपल्या पक्षाच्या कुठल्याही पदावर स्थान न मिळालेल्या लोकप्रतिनिधींनी विधानपरिषदेच्या सभापतींवर बोलू नये हीच सदिच्छा, असेही धोदाड यांनी म्हटले.