
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्या आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल माहिती नसावा, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी दिली आहे.

पोटरे यांनी सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच झालेल्या निकालानुसार विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती निवडणुकीत प्रचार करू शकतात. त्यांच्यावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी सभापतींना राजशिष्टाचार शिकवण्याची गरज नाही.”

याशिवाय, रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका करताना पोटरे म्हणाले की, “लोकशाहीला पायदळी तुडवत कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात दडपशाही आणि दहशतीच्या माध्यमातून भाजप उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले गेले. दुकाने बंद पाडणे, अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे यासारखे प्रकार घडले. त्यामुळे पवार यांनी आधी आत्मचिंतन करावे.”

शिवप्रेमींच्या भूमिकेवरूनही रोहित पवार यांना लक्ष्य करत पोटरे म्हणाले, “औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होत असताना, त्यावर हार-फुले वाहिले जात असताना त्यांनी विरोध केला नाही. तसेच, खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यावर केवळ इव्हेंटसाठी भगवा ध्वज उभारला, पण १९ फेब्रुवारीच्या शिवजयंतीला किंवा मराठ्यांच्या शेवटच्या विजयाच्या लढाईला २२० वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो ध्वज उभारला नाही. त्यामुळे आम्ही सर्व शिवप्रेमींच्या वतीने त्यांचा निषेध करतो.”
प्रा. राम शिंदे यांना सुसंस्कृत राजकारणी म्हणत, पोटरे यांनी विश्वास व्यक्त केला की, “शिंदे हे आपल्या अनुभव आणि निष्ठेच्या जोरावर सभापती पदाची गरिमा राखतील.”