
कर्जतच्या बुवासाहेब नगर भागात सेंट्रिंगचे काम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलेल्या सोनू कुमार पासवान (वय २४) याला बेशुद्ध अवस्थेत विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उत्तर प्रदेशातील मूळ गाव असलेल्या या रुग्णाच्या सिटी स्कॅन तपासणीत चेहऱ्यावर तीन ठिकाणी फ्रॅक्चर, नाकाच्या हाडाला फ्रॅक्चर आणि मेंदूच्या वरील आवरणामध्ये रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. एवढ्या गुंतागुंतीच्या अवस्थेतही रुग्णावर तातडीने योग्य उपचार सुरू करून त्याला कृत्रिम श्वासोच्छवासासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या टीमच्या अथक प्रयत्नांमुळे मृत्यूच्या दारातून हा रुग्ण सुखरूप घरी परतला. याबाबत हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की, रुग्ण व्हेंटिलेटरवर असतानाच त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. जनरल सर्जन डॉ. प्रवीण बॉस, भूलतज्ज्ञ डॉ. सुमित पाटील आणि डॉ. मनोज कुमार शिंदे यांच्यासह हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने तब्बल चार तास शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारली. सहा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून त्याला श्वासोच्छवासासाठी मदत करण्यात आली. रात्रंदिवस मेहनत करून, आठव्या दिवशी रुग्ण पूर्णपणे बरा होऊन आनंदात घरी परतला.

रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर कन्स्ट्रक्शन मालक आणि रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये येऊन विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. मधुकर कोपनर यांनी ही माहिती दिली.
