गावातील राजकारण : सत्तासंघर्ष, कट्टरता आणि नव्या नेतृत्वावरील संकटे

कर्जत : प्रा. किरण जगताप

अनेक गावातील राजकारण हे प्रामुख्याने दोन प्रमुख पक्षांच्या, राजकीय घराण्यांच्या सत्तासंघर्षावर आधारित असते. या पक्षांचे, घराण्यातील नेते हे जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये राजकीय कट्टरता भासवतात. गाव नेते हे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांबाबत नेहमी विष पेरून एकमेकांमध्ये कटुतेचे वातावरण ठेवतात. त्यानुसार कार्यकर्ते हे नेत्याच्या आदेशाचे पालन करून विरोधकांच्या अंगावर जाऊन भिडतात. त्यातून दोन्ही नेते हे कट्टर विरोधक असल्याचे जनतेला भासवले जाते.

प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी असते. गावातील हे दोन्ही नेते नेहमी एकमेकांच्या संपर्कात असतात. गावातील लोकांचे होणारे वाद, आंदोलने, ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणे, इतर प्रश्न अधिक प्रमाणावर पेटवून देत लोकांमध्ये कट्टरता आणि संघर्षाची भावना निर्माण करतात. लोकांच्या भावनांशी खेळत त्यांचा गैरवापर करतात. त्याचा परिणाम गावाच्या सामाजिक वातावरणावर होतो.

गावातील राजकीय नेते जनतेच्या हितासाठी काम करण्याचा दावा करतात, पण प्रत्यक्षात त्यांचे लक्ष हे फक्त आपल्या दोघांकडे व दोघांच्या सोयीने सत्ता कशी राहील याकडे असते. निवडणुकीच्या काळात हे नेते आपल्या समर्थकांना कट्टर राहण्याची प्रेरणा देतात, ज्यामुळे गावातील दोन गटांमध्ये संघर्ष वाढतो. कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या नेत्याला पाठिंबा देत एकमेकांशी भिडतात, त्यातून टोकाचे वाद होतात आणि समाजात तणाव निर्माण होतो. या संघर्षाचा सर्वाधिक फायदा मात्र नेत्यांनाच होतो. कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर ते आपल्या नेत्यांकडे आधारासाठी जातात. त्यावर दुकानदारी करत हे नेते वाद मिटवल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात.

गावात जर दोन प्रमुख पक्ष असतील आणि तिसरा पर्याय उदयास येऊ लागला, तर दोन्ही पक्षांचे नेते त्याच्या विरोधात एकत्र येतात. पारंपरिक राजकारण करणाऱ्या नेत्यांना नवीन नेतृत्व हे अडथळा वाटतो. विकासाच्या आणि बदलाच्या आशेने नव्या उमेदीनं काम करणाऱ्या युवकांना हे नेते सहजपणे पुढे येऊ देत नाहीत. त्याऐवजी, त्यांच्या कार्याला खोडा घालण्यासाठी विविध नीच उपायांचा अवलंब केला जातो.

नवीन नेतृत्वाला नामोहरम करण्यासाठी या नेत्यांकडून अनेक पद्धती वापरल्या जातात. कुटुंबांत वाद निर्माण करणे, शेजाऱ्यांना भांडणासाठी प्रवृत्त करणे, कार्यकर्त्यांना फोडणी देणे, महिलांचा गैरवापर करून सामाजिक तणाव निर्माण करणे, नवे नेतृत्व उभे करणाऱ्या व्यक्तींमध्ये मतभेद वाढवणे अशा अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. हे नेते नव्या नेतृत्वाच्या जवळच्या व्यक्तींशी जवळीक साधून त्यांच्यातच कटूता निर्माण करतात, जेणेकरून त्यांचा आधार तुटेल.

नवीन नेतृत्वाने जर गावाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, तरी पारंपरिक नेते त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात. समाजात त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न केले जातात, त्यांच्या विरोधात अफवा पसरवल्या जातात, आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यांच्यावर कृत्रिम संकटे आणली जातात, त्यांच्या उपक्रमांना अडथळे निर्माण केले जातात. हे सर्व एवढ्या नियोजनबद्ध पद्धतीने केले जाते की शेवटी नवीन नेतृत्वाची उमेदच गळून पडते. जेव्हा नव्या नेतृत्वाचे मनोधैर्य खचते, तेव्हा पारंपरिक पक्ष पुन्हा आपली जुनी सत्ता कायम ठेवतात. दोन्ही प्रमुख पक्ष आपल्या सोयीने राजकारण करतात, लोकांना मूर्ख बनवतात आणि आपल्या सत्तेचा फायदा करून घेतात. अशा परिस्थितीत, गावाच्या विकासासाठी कोणताही ठोस प्रयत्न केला जात नाही.

गावातील राजकारण जर खऱ्या अर्थाने पारदर्शक आणि लोकहिताचे असावे, असे वाटत असेल, तर नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. कट्टर पक्षीय राजकारणात अडकण्यापेक्षा, विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. गावातील राजकारण हे केवळ दोन पक्षांच्या सत्तासंघर्षापुरते मर्यादित राहता कामा नये. जनतेच्या समस्या, विकासाचे मुद्दे आणि सामाजिक सलोखा यांना केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. पारंपरिक राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या स्वार्थी खेळांपासून सावध राहणे आणि नव्या नेतृत्वाला संधी देणे हाच गावाच्या प्रगतीचा मार्ग ठरू शकतो.