कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी उमेश जपे बिनविरोध

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आज फोटोग्राफर स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उमेश जपे – अध्यक्ष, भरत तुपे – उपाध्यक्ष, आकाश बिडकर – सचिव, महेश जाधव – कार्याध्यक्ष, तुकाराम सायकर – खजिनदार तर संचालकपदी बबन कोरे, महिंद्र उघडे, अजित अनारसे, नितीन काळे आणि सुनील शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा आणि कॅमेरा पूजन करून करण्यात आली. यानंतर अद्यावत प्रणाली, सोशल मीडियाचा वापर, वाढती महागाई आणि व्यावसायिक नियोजन कसे असावे या संदर्भात सागर डाळिंबे यांनी प्रस्ताविकामध्ये मार्गदर्शन केले.

महागाईच्या संकटामुळे वाढलेल्या कॅमेऱ्याच्या, शाईच्या आणि पेपरच्या किंमती लक्षात घेऊन असोसिएशनच्या वतीने फोटोग्राफीदर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. साखरपुडा, लग्नसमारंभ, वाढदिवस आणि विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी फोटोग्राफीच्या दरामध्ये वाढ करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार नवीन दरपत्रक सर्व छायाचित्रकारांना वाटप करण्यात आले.

छायाचित्रकार व्यावसायिकांचे कुटुंब, मुलांचे शिक्षण, फायनान्सवरील कर्ज आणि मोबाईलमुळे फोटोग्राफी व्यवसायाला बसलेला फटका यामुळे शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केली. शासनाने “लाडकी बहिण” योजनेप्रमाणेच फोटोग्राफर व्यवसायासाठीही एखादी योजना राबवावी, अशी त्यांची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी सचिन पोटे, नितीन कोल्हे, आकाश बिडगर, अजित अनारसे, राजेंद्र खैरे, योगेश लांडगे, कैलास पंडित आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमानंतर सर्व छायाचित्रकार बांधवांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब गायकवाड यांनी केले, तर आभार शिरीष यादव यांनी मानले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दौंड येथील पदाधिकारी तसेच तालुक्यातील सर्व फोटोग्राफर उपस्थित होते.