लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची विटंबना थांबवा : सूर्यकांत कोरे

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील लिंगायत समाजाला आहे त्या ठिकाणी हक्काची स्मशान भूमी मिळावी यासाठी गेली कित्येक वर्ष वीरशैव लिंगायत समाज प्रशासनाशी लढत आहे. वारंवार आंदोलन करून, त्या जागेचा पाठपुरावा करण्यात आला तसेच तिथे अतिक्रमण केलेल्या जागा मालकाला देखील समज देण्यात आली. मात्र त्याला यश आले नाही. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची विटंबना थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत कोरे यांनी केली आहे.

कोरे यांनी म्हटले आहे, मागे ३१ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर कर्जतचे तहसीलदार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत जागा मोजणीचे आदेश देण्यात आले तसेच प्रशासनाकडून जागा मोजणी होईपर्यंत स्मशान भूमीच्या जागेवर कुठलाही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही असे आदेश देण्यात आले. असे असताना देखील या जागा मालकाने प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून दिमाखात महाशिवरात्री दिवशी तिथे मोठ्या स्वरूपात कार्यक्रम आयोजित केला.

एक-दोन वर्षांपूर्वी झालेल्या मयत व्यक्तीच्या समाधीची विटंबना करून समाधीवर गोड जेवणाचे कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. हे सगळं पाप होत असताना प्रशासन तिथे दुर्लक्ष करून या पापात सहभागी होत आहे. लिंगायत समाजाच्या भावनेशी खेळ चालू असताना देखील प्रशासनाला जाग येत नसेल तर न्याय मागायचा कुठे ? असा सवाल आता लिंगायत समाजाला पडला आहे.

आता सुरु होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, सिद्धेश्वर मंदिर कोरेगाव हा हि याच जागेवर होत आहे. लिंगायत समाजाच्या मयत व्यक्तीच्या समाधीवर वारंवार होत असलेले कार्यक्रम बंद करण्यात यावे. याचा अर्थ अखंड हरिनाम सप्ताहला विरोध नाही. फक्त जागेला विरोध आहे. लिंगायत समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत कोरे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की येथे वेळीच लक्ष घालून समाजाचा प्रश्न लवकर सोडवण्यात यावा नाहीतर लिंगायत समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल.