बारडगाव सुद्रिक येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद बाजार मेळावा उत्साहात

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवार, दि. १० रोजी ‘बाल आनंद बाजार’ मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या आनंद बाजाराचे उद्घाटन मुख्याध्यापक अजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विजय सुद्रिक, गणेश सुद्रिक, महेंद्र शेटे, अमोल साबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश सस्ते, सोमनाथ सुद्रिक, विश्वास वाघमारे, दादा वाघमारे, निखिल जाधव, संतोष उदमले, प्रवीण गावडे, राहुल पिसाळ, संदीप गावडे, अतुल गावडे, किशोर सस्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

या बाल आनंद बाजारामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले वडापाव, पोहे, उसळ, उपमा, भेळ आणि गुलाबजाम यांसारख्या खाद्यपदार्थांची विक्री केली. तसेच भाजीपाला व कडधान्य विभागात मेथी, कोथिंबीर, गाजर, कांदे, लसूण आणि तांदूळ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत खरेदी-विक्रीचा व्यवहार केला, ज्यामुळे त्यांना हिशोब ठेवणे आणि नफा-तोटा समजून घेणे अशा व्यावहारिक गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. दिवसभरात या बाजारातून हजारो रुपयांची उलाढाल झाली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका शुभांगी भालेराव, मंगेश काळे आणि ललिता गोडसे यांनी विशेष परिश्रम घेतले. पुस्तकी शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञानाची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरत असल्याची भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.