
कर्जत शहराच्या विकासात आणि वाहनधारकांच्या सोयीत मोलाची भर घालत कर्जतमधील ‘पंढरीनाथ पेट्रोलियम’ येथे सीएनजी गॅस पंपाचा शुभारंभ करण्यात आला. श्रीमती केशरबाई पंढरीनाथ नेवसे आणि कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सुविधेमुळे कर्जत तालुक्यातील सीएनजी वाहनधारकांची मोठी अडचण दूर झाली आहे.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रवीण घुले यांनी नेवसे परिवाराच्या व्यावसायिक प्रवासाचे कौतुक केले. ते म्हणाले की, नेवसे परिवाराने सुरुवातीला आडत व्यापारात शेतकऱ्यांना रास्त भाव देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पेट्रोल पंप आणि आता सीएनजी पंप सुरू करून त्यांनी व्यवसायात मोठी प्रगती केली आहे. माजी नगरसेविका मनिषा सोनमाळी यांनीही नेवसे परिवाराच्या कष्टाचा गौरव करत, मुलांनी आपल्या आई-वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व्यवसायाचा विस्तार केल्याचे नमूद केले.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा रोहिणी घुले म्हणाल्या की, शहरात सीएनजी वाहनांची संख्या मोठी आहे, मात्र पंपाअभावी वाहनधारकांना लांबवर जावे लागत होते. आज पप्पू नेवसे यांनी ही सुविधा उपलब्ध करून देऊन मोठी गरज पूर्ण केली आहे. राजेंद्र फाळके यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत नेवसे परिवाराच्या सामाजिक व व्यावसायिक बांधीलकीची प्रशंसा केली.

बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर सीएनजी पंपापाठोपाठ लवकरच या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
या सोहळ्याला कर्जत परिसरातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. यामध्ये उपसभापती अभय पाटील, उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, अमृत खराडे गुरुजी, रावसाहेब धांडे, सुनील शेलार, सचिन घुले, सतीश पाटील, भाऊसाहेब तोरडमल, संचालक पप्पू नेवसे, किरण नेवसे आणि इतर पदाधिकारी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. नवनाथ फोंडे यांनी केले, तर सुनील शेलार यांनी आभार मानले. या उपक्रमामुळे संपूर्ण कर्जत तालुक्यातून नेवसे परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





