
कर्जत तालुका बार असोसिएशन संघटनेच्या उपाध्यक्षपदी ॲड. दत्तात्रय चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील भीमसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून संघटनात्मक बळ अधिक मजबूत होणार असल्याची भावना अविनाश अडसूळ यांनी व्यक्त केली आहे.

ॲड. चव्हाण हे सामाजिक, कायदेशीर व संघटनात्मक कार्यात सातत्याने सक्रिय असून त्यांनी नेहमीच वंचित, शोषित व सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे कर्जत तालुक्यातील वकील संघटनेला अधिक गतिमान व सकारात्मक दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या निवडीचे स्वागत करताना अविनाश अडसूळ यांनी सांगितले की, ॲड. दत्तात्रय चव्हाण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारधारेचे प्रामाणिक पालन करणारे आहेत. त्यांची ही निवड युवकांसाठी प्रेरणादायी असून तालुक्यातील भीमसैनिकांच्या मनगटात बळ निर्माण करणारी आहे.


त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक संघटना, युवक कार्यकर्ते तसेच सहकारी वकिलांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भारतीय बौद्ध महासभेचे कर्जत तालुकाध्यक्ष कुलदीप गंगावणे यांनीही ॲड. चव्हाण यांचे अभिनंदन करताना सांगितले की, शिंपोरा व बाभूळगाव सारख्या तालुक्यातील खेडेगावातून येऊन त्यांनी उभा केलेला हा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे. हा प्रवास गावखेड्यातील युवक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून आजच्या युवा पिढीने उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन सामाजिक व चळवळींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

