कर्जतमध्ये तमाशा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

कर्जत : प्रा. किरण जगताप

तमाशा सारखी पारंपारिक लोककला जपणं आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तमाशा प्रशिक्षण शिबिर घेणे ही काळाची गरज आहे, कारण अशा प्रशिक्षण शिबिरातूनच नवीन कलावंत घडतील असे प्रतिपादन कर्जतच्या नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने कर्जत येथे आयोजित १० दिवसीय तमाशा प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. दिवंगत तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे नातू डॉ. मोहित सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटन समारंभास मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव, कर्जतचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव, ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर, सचिव गणेश गायकवाड आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष रोहिणी घुले पुढे म्हणाल्या की, अलीकडच्या काळातील चित्रपट, टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया सारख्या विविध माध्यमांच्या भाऊ गर्दीत आपली पारंपारिक तमाशा ही कला हरवून जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु अजूनही ग्रामीण भागातील ग्रामदैवतांच्या जत्रा, यात्रा मधून महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या तमाशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच शासनाच्या माध्यमातून देखील दरवर्षी तमाशा महोत्सव, तमाशा प्रशिक्षण शिबिरे आयोजित केले जातात. त्यामुळे ही कला नष्ट होणार नाही कारण ही जिवंत कला आहे.

प्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले तमाशा प्रशिक्षण शिबिर ही नवोदित कलावंतासाठी बरेच काही शिकण्याची एक चांगली पर्वणी आहे. या पर्वणीचा नवोदित कलावंतांनी लाभ घेतला पाहिजे. कारण तमाशाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे लोकरंजन व प्रबोधन होते. तमाशा आणि वगनाट्य हे महाराष्ट्राचा प्राण आहे. मात्र या कलेला अलीकडच्या काळात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यावर मात करणे ही तमाशा कलावंता बरोबरच तमाशा रसिकांची ही जबाबदारी आहे.

ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी तमाशा कलावंतांचे संघटन राज्य पातळीवर मजबूत होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तमाशातील वगनाट्यातून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य केले जाते. पारंपारिक तमाशा मधून गण, गवळण, लावणी, मुजरा, बतावणी आणि वगनाट्य असे विविध पैलू उलगडून दाखविले जातात. परंतु वेळेच्या बंधनामुळे तमाशा कलावंतावर देखील अनेक मर्यादा आल्या आहेत या मर्यादा शिथिल कराव्यात.

यावेळी संभाजीराजे जाधव, पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ, योगेश सुपेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दिवंगत शाहीर पठ्ठे बापूराव, दिवंगत तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, नटराज पूजन व दीप प्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन झाले.

उद्घाटन समारंभानंतर तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर, रेखा चव्हाण कोरेगावकर, संदीप पंचरास लोणीकर, चंद्रकांत शिंदे, शिवकन्या चव्हाण संगमनेरकर, सागर आव्हाड ठाणगावकर, अश्रुबा वंजारी, शिवाजी वंजारी, शिवकन्या चव्हाण संगमनेरकर, संतोषी वडाळीकर, भाग्यश्री नांदेडकर, मारुती आखाडे, हिरालाल कोकाटे, कामिनी गायकवाड पुणेकर, दिनकर पठारे, हमरापुरकर आदींनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना पारंपारिक तमाशा सादर करून दाखवला. उद्घाटन समारंभास मारुती सूर्यवंशी, शब्बीर भाई पठाण, सोमनाथ भैलुमे, संतोष पवार, शुभम जाधव, बाबा चंदन, अरविंद जाधव, बाबा राजगुरू यांच्यासह प्रा. स्वप्निल मस्के, वसंतराव नाईक महाविद्यालय व शंकरराव पाटील महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. शिबिर संचालक हसन शेख पाटेवाडीकर यांनी प्रास्ताविक केले. भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत शिंदे कापरेवाडीकर यांनी आभार मानले.