
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी ६५ इंची आधुनिक इंटरॅक्टिव्ह पॅनल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या डिजिटल साधनामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक प्रभावी आणि आकर्षक पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे. व्हिडिओ, चित्रफीत, सादरीकरणे आणि विविध शैक्षणिक ॲप्सच्या माध्यमातून अभ्यास अधिक सोपा व समजण्यास सुलभ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस वाढण्यास मदत होणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळणार आहे. शाळेतील शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना शिकवताना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करता येणार असल्याने शिकवण्याची गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या उपक्रमाबद्दल टाकळी खंडेश्वरीचे सरपंच मंगलताई भालेराव, अमोल पाटील, डॉ. सागर ढोबे, बाळासाहेब सपकाळ, विठ्ठल सावंत, मेजर गितेश पवार, संभाजी हराळ, परशुराम हराळ, विनोद पवार, सतीश किरदात, रमेश आखाडे, बापू देवकर, संतोष निकम, नवनाथ पवळ, सविता शेळके आणि शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पोतदार, आबासाहेब हराळ, सिरीन पठाण आणि ग्रामस्थांच्या वतीने प्रा. राम शिंदे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.




