टपऱ्या काढण्याच्या नोटीसीविरोधात दिव्यांग व्यक्ती व विधवा महिलेचे उपोषण

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथे ग्रामपंचायतीच्या जागेवरील टपऱ्या काढण्याच्या नोटीसीविरोधात दिव्यांग व्यक्ती व विधवा महिलेने उपोषण सुरू केले आहे.

पाटेवाडी येथील दिव्यांग व्यक्ती बारकू किसन खरात तसेच विधवा महिला मंगल श्रीधर पोकळे यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी ग्रामपंचायतीच्या जागेत टपऱ्या उभारल्या आहेत. ग्रामसभेच्या ठरावाद्वारे या टपऱ्या कायम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले. तरी गणेश देशमुख, वैशाली सुरवसे, अर्चना देशमुख आणि निर्मला देशमुख यांच्या दबावाखाली दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी टपऱ्या काढून टाकाव्यात अशी नोटीस देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हा आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. टपऱ्या काढल्यास आम्ही कसे जगायचे?असा प्रश्न संबंधितांनी उपस्थित केला आहे. अन्याय होत असल्याचा आरोप करत मयूर राजेभोसले, बारकू किसन खरात व मंगल श्रीधर पोकळे यांच्यासह कुटुंबीयांनी कर्जत येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा त्यांचा निर्धार आहे.

या उपोषणाला बापू क्षीरसागर, अशोक कदम, संतोष रोकडे आणि सागर क्षीरसागर यांनी पाठिंबा दिला आहे. गटविकास अधिकारी यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. ग्रामसभेचा ठराव अमान्य करण्यात येत असल्याने आणि प्रशासनाकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळत असल्याने गटविकास अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.