
साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व यांचा सुंदर संगम डॉ. सागरकुमार ढोबे पाटील यांच्या स्वभावात दिसून येतो. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी यशाचा सुवर्णकळस गाठला. आज व्यवसायात त्यांना लाभलेले यश हे केवळ नशिबाचे देणं नसून अथक परिश्रम, खडतर प्रवास आणि भक्कम साधनेचा पाया यांची फलश्रुती आहे. विश्वास हा शब्द जिथे अपुरा पडतो तिथे डॉ. सागरकुमार यांचे नाव आदराने घेतले जाते. रिझर्व्ह बँकेच्या लॉकरपेक्षाही अधिक सुरक्षितपणे अनेकांच्या विश्वासाचा अमूल्य ठेवा त्यांनी जपला आहे. अडचणीच्या काळात अगदी मध्यरात्रीसुद्धा मदतीचा हात पुढे करणारे त्यांचे विशाल हृदय सर्वांना आपलेसे वाटते.

व्यवसायाच्या धकाधकीतही सामाजिक बांधिलकी जपणारे हे व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. गावातील प्रत्येक मुलीच्या विवाहासाठी ५००० रुपयांचे कन्यादान, जेसीबीच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरजूंची सेवा, नवयुवकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देणे ही त्यांची कार्ये केवळ उपक्रम नसून समाजहिताची जाणीवपूर्वक जोपासलेली परंपरा आहे.

माहीजळगाव परिसरात वैद्यकीय सेवा अविरतपणे देताना टाकळी खंडेश्वरीचे सरपंच म्हणून त्यांनी केलेले कार्य गावाच्या प्रगतीचे अधोरेखित उदाहरण आहे. विकासाची नवी दिशा देत प्रगतशील भागाचे नवभविष्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे समाजात सकारात्मक बदलाची चळवळ उभी राहिली आहे.


तसेच गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव आणि सर्व सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन समाजाला एकत्र बांधण्याचे आणि संस्कृतीची परंपरा जपण्याचे कार्य ते सातत्याने करत असतात.

संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओवीप्रमाणे पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असे नाव सर्वत्र गाजणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. शिवनेरी किल्लाची श्रीमंती, रायगड किल्लाची भव्यता, पुरंदर किल्लाची दिव्यता, सिंहगड किल्लाची शौर्यता आणि सह्याद्री पर्वतरांगची उंची त्यांच्या कार्याला लाभो हीच शिवचरणी प्रार्थना. आई तुळजाभवानीच्या कृपेने त्यांचे आयुष्य आरोग्यसंपन्न, यशस्वी आणि शतायुषी होवो.
डॉ. सागरकुमार ढोबे पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांची पुढील वाटचाल अधिक यशस्वी, समाजोपयोगी आणि प्रेरणादायी ठरो हीच सदिच्छा.
– परशुराम हराळ, सामाजिक कार्यकर्ते

