
सांगली येथे सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

राज्यभरातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता २ रीतील विद्यार्थिनी जैनब फतेहमोहम्मद शेख हिने आपल्या उल्लेखनीय यशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत जैनब हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तिला प्रमाणपत्र व १० हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. जैनबच्या यशामुळे कोरेगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी कोरेगावचे माजी सरपंच युवराज शेळके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नामदेव शेळके, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अजय थोरात, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रामेश्वर मेंगडे वर्गशिक्षिका शितल भोसले, मुख्याध्यापिका संध्या जगताप, संगीता देशमाने, सारिका खेतमाळस, वृषाली धेंडे तसेच जैनबचे पालक हुसैन शेख, तायरा शेख, हसन शेख उपस्थित होते.


या सर्व मान्यवरांनी जैनबचे कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अल्पवयातच आपल्या कलागुणांची झलक दाखवत जैनबने कोरेगाव व कर्जत तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. तिच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही कला क्षेत्रात प्रोत्साहन मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


