
अकोले तालुक्यातील देवठाण येथे लोककलेचा भव्य जल्लोष अनुभवायला मिळणार असून सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी रेखा चव्हाण कोरेगावकर यांना यंदाचा महाराष्ट्र कला भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. हा मानाचा पुरस्कार लोक कलावंत सांस्कृतिक विचार मंच आणि महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान केला जाणार आहे.

दि.१ मार्च २०२६ रोजी आयोजित लोककला महोत्सवात सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे सहसचिव संदिप बलखंडे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराची घोषणा मंचाचे संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे यांनी केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या सहा महिन्यांत मिळालेला हा दुसरा मानाचा पुरस्कार असल्याने रेखा चव्हाण यांच्या चाहत्यांमध्ये व कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण आहे. लोकमनोरंजनातून समाजप्रबोधन करण्याचा वसा त्यांनी जपला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या सोहळ्यात राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या रेश्मा मुसळे परितेकर, महाराष्ट्रातील नवोदित गायिका गायत्री शेलार, तसेच सिने अभिनेत्री अलका जोगदंड यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ लोककलावंत हसन शेख पाटेवाडीकर, मारुती आखाडे, चंद्रकांत शिंदे, बबनराव भोसले, मनिषा घोलप, मारुती सुर्यवंशी, राजेंद्र कदम, प्रदिप सोनवणे, तात्यासाहेब जाधव तसेच हभप तात्यासाहेब शेगडे उपस्थित राहणार आहेत. त्यांनी रेखा चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रेखा चव्हाण व त्यांचे पती वसंत चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले असून लोककलेची सेवा हेच आमचे ध्येय अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या भव्य लोककला महोत्सवाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून देवठाण येथे सांस्कृतिक सोहळ्याची रंगत अधिकच वाढणार आहे.


