मुलाच्या स्मरणार्थ गोमातेसाठी एक दिवसाचे पालकत्व

कर्जत : प्रा. किरण जगताप

मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीप्रमाणे बारडगाव येथील मोहन बाबुराव गावडे यांनी आपल्या दिवंगत सुपुत्र कै. सुहास गावडे (कारभारी) यांच्या स्मरणार्थ एक आदर्श उपक्रम राबविला. राशीन येथील यशोदानंद गोशाळा येथे गोमातेसाठी चाऱ्याची व्यवस्था करून त्यांनी एक दिवसाचे पालकत्व स्वीकारले.

कै. सुहास गावडे (कारभारी) यांच्या अकाली निधनामुळे गावडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या दुःखात खचून न जाता आपल्या लाडक्या मुलाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभावी या हेतूने कुटुंबियांनी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले. त्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच जालना येथील हभप रवींद्र महाराज मदने यांच्या जाहीर कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांमुळे समाजात एक सकारात्मक संदेश देण्याचे काम गावडे कुटुंबियांनी केले आहे.

दुःखाला सामोरे जात समाजहिताची वाट निवडणे हा त्यांचा आदर्श अनुकरणीय आहे. कै. सुहास गावडे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच गोमातेच्या चरणी प्रार्थना व्यक्त करण्यात आली.

यावेळी मोहन बाबुराव गावडे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच नागरिकांनीही आपले वाढदिवस, शुभकार्य किंवा पूर्वजांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर, गोमातेसाठी चाऱ्याची व्यवस्था करून गोसेवेचा संकल्प करावा असे आवाहन केले.