
कर्जत तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या बदलीविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. दिव्यांगांच्या हक्कांसाठी सातत्याने काम करणारे आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेणारे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या मुंडे यांच्या बदलीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

दिव्यांग बांधवांचे म्हणणे आहे की बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या, विविध कंत्राटे आणि परवाने मिळवणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मुंडे यांनी कठोर कारवाई सुरू केली होती. तसेच दिव्यांगांच्या नावावर चालणाऱ्या संस्थांमधील गैरव्यवहार उघडकीस आणण्याचे कामही त्यांनी हाती घेतले होते. त्यामुळे अनेक भ्रष्ट प्रवृत्तींचा पर्दाफाश होत असताना अचानक त्यांची बदली करण्यात आल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

राज्यातील लाखो दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली हा अन्याय आहे अशी भावना कर्जत तालुक्यातील दिव्यांगांनी व्यक्त केली. त्यांनी शासनाला आवाहन केले आहे की तुकाराम मुंडे यांची बदली तात्काळ रद्द करून त्यांना पुन्हा त्यांच्या पदावर कायम ठेवावे.
दिव्यांग बांधवांनी इशारा दिला आहे की त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. न्याय आणि पारदर्शकतेसाठी लढणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

