नेत्याच्या हस्तक्षेपामुळे उत्खनन पंचनाम्यास टाळाटाळ ; तहसीलदारांविरुद्ध तक्रार

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील रामचंद्र जगताप यांच्या गट नंबर ९१३/३ मध्ये सुमारे १००० ब्रास उत्खनन करण्यात आलेले आहे. कर्जत महसूल विभागाकडे तक्रार केली, मात्र महसूल विभागाच्या विविध नियमांचे उल्लंघन करून तहसीलदार यांनी वेळोवेळी उत्खननाचा पंचनामा व वाहनांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केलेली आहे. योग्य कारण, खुलासा न देता तसेच नियमबाह्य पद्धतीने अर्ज निकाली काढून मला न्यायापासून वंचित ठेवले आहे. एका राजकीय नेत्याच्या दबावापोटी शासकीय नियमांचे उल्लंघन करून तहसीलदार यांनी नियमानुसार कारवाई केलेली नाही. या प्रकरणात तहसीलदारांनी वेळकाढूपणा केलेला आहे. त्यामुळे तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी यांच्या या प्रकरणातील कामकाजाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करावी. झालेल्या उत्खननाचा पंचनामा करून संबंधितांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जगताप यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे अपिल अर्जाद्वारे केली आहे.

अर्जात त्यांनी म्हटले आहे, कुळधरण येथील माझ्या मालकीच्या गट नंबर ९१३/ ३ मधील शेतात भरत बापू खराडे, रा. कुळधरण यांनी मशीन लावून मुरुम व मातीचे उत्खनन केले. उत्खनन केलेली सुमारे ८०० ते १००० ब्रास माती व मुरूम त्यांनी वाहनांद्वारे भरत बापू खराडे व केशरबाई भरत खराडे यांच्या गट नंबर ९१६/ १ मध्ये टाकल्याची तक्रार १३ जून २०२३ रोजी देण्यात आली. त्यापूर्वीही ९१३/३ मध्ये उत्खनन केल्याची तक्रार महसूल विभागाकडे दाखल करण्यात आली होती. उत्खननाचा पंचनामा करून वाहतूक करणारी वाहने व संबंधित व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार गणेश जगदाळे यांनी नुकतेच लेखी पत्र देऊन मला हा अर्ज निकाली काढल्याचे कळवले आहे. मात्र याबाबत माझे आक्षेप आहेत. तहसीलदार यांनी तक्रारीच्या अनुषंगाने तलाठी व मंडळ अधिकारी यांचा स्थळ निरीक्षण अहवाल १४ जून २०२३ रोजी प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. मात्र या अहवालानुसार ९१३/ ३ मध्ये उत्खनन झाले आहे काय ? असल्यास ते किती ब्रास उत्खनन झाले ? स्थळ निरीक्षण अहवालानुसार तहसीलदार यांनी तलाठी व ममंडळाधिकारी यांच्याकडून उत्खनन झालेल्या क्षेत्राचा पंचनामा का केला नाही ? महसूल विभागाकडून उत्खननाची मोजणी करणे अपेक्षित असताना तहसीलदार यांनी भूमी अभिलेख यांच्याकडे मोजणी करण्याचे पत्र कोणत्या कारणास्तव दिले ? याबाबतची कोणतीही माहिती तहसीलदार जगदाळे यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये दिलेल्या पत्रातून मिळालेली नाही.

मंडळाधिकारी, भांबोरा यांनी ५ जानेवारी २०२३ रोजी अहवाल सादर केल्याचे तहसीलदारांनी कळवले आहे. या अहवालामध्ये गट नंबर ९१३/ ३ मध्ये जमीन सपाटीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र माझ्या मालकीच्या या गटामध्ये माझ्याकडून कोणतेही सपाटीकरण काम करण्यात आलेले नाही. हे सपाटीकरणाचे काम कोणी केले ? सपाटीकरण काम करण्यासाठी तेथे कोणते मशीन, वाहने वापरण्यात आली ? सपाटीकरण करताना विनापरवाना नियमबाह्य पद्धतीने किती खोलीपर्यंत जमिनीचे उत्खनन करण्यात आले ? तेथे गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या नियमबाह्य उत्खननाचा पंचनामा केलेला नाही. बेकायदा उत्खननाबाबत लेखी तक्रार असताना तहसीलदारांनी उत्खनन करणाऱ्या व्यक्तीवर कोणती कारवाई केली ? याबाबतची माहिती तहसीलदार यांनी लेखी पत्रातून दिलेली नाही.

तहसीलदार यांनी कार्यालयाचे पत्र क्रमांक कावि/ जमा- गौख /१४७ /२०२३ दि. १३/ २/ २०२३ नुसार अर्ज निकाली काढण्यात आल्याचे म्हटले आहे. दिलेल्या लेखी तक्रार अर्जावर कोणतीही कारवाई न करता तसेच तक्रारदारास त्याबाबत कसलीही सूचना देता तहसीलदारांनी अर्ज निकाली काढला आहे. त्याची आपल्याकडून सखोल चौकशी करण्यात यावी.

तहसीलदार यांच्या पत्रानुसार गट नंबर ९१६ / १ मध्ये सपाटीकरणाचे काम सुरू होते. त्यामध्ये झालेल्या उत्खननात ९१३ / ३ चा थोडा भाग सपाटीकरणासाठी वापरण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. लेखी तक्रारीनुसार ९१३/ ३ मध्ये बेकायदेशीररित्या व नियमबाह्य पद्धतीने ८ ते १० फूट खोलीपर्यंत उत्खनन करण्यात आले असतानाही त्याचा पंचनामा का करण्यात आला नाही ? पंचनामा केला असल्यास त्याची लेखी माहिती तक्रारदारास का दिली नाही ? याची चौकशी करण्यात यावी.

तहसीलदार यांनी गट नंबर ९१३/ ३ मध्ये भरत बापू खराडे यांनी सीमा निश्चिती होण्याआधी उत्खनन केल्याचे म्हटले आहे. उत्खनन केलेली माती व मुरूम हा गट नंबर ९१३/ ३ व ९१६ / १ या गटामध्ये सपाटीकरण करण्यासाठी व विकसनासाठी वापरल्याचे म्हटले आहे. मात्र मी उत्खनन केल्याचा तक्रार अर्ज १३ जून २०२३ रोजी दिलेला आहे. गट नंबर ९१६ ची मोजणी २/ २/ २०२३ रोजी करण्यात आलेल्या असून २७ / २/ २०२३ रोजी भुमिअभिलेख विभागाकडून हद्द निश्चित (सीमा निश्चिती ) करण्यात आलेली आहे. मोजणी व सीमानिश्चिती झाल्यानंतर भरत बापू खराडे यांनी १३/ ६/२०२३ रोजी गट नंबर ९१३/ ३ मध्ये उत्खनन केलेले आहे. त्याच दिवशी तहसीलदार यांच्याकडे ही तक्रार दाखल करण्यात आली होती. तरीही अद्यापपर्यंत तहसीलदारांकडून यावर पंचनामा व कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.

गट नंबर ९१३ / ३ मध्ये उत्खनन करून त्यातील माती व मुरूम हे भरत बापू खराडे व केशरबाई भरत खराडे यांच्या ९१६ / १ या गटामध्ये बेकायदेशीररित्या वापरण्यात आलेले आहे. हे गट स्वतंत्र असताना तसेच नियमबाह्य पद्धतीने ८ ते १० फूट खोलीपर्यंत उत्खनन केले असतानाही तहसीलदार गणेश जगदाळे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १६६ चे कलम ४८ ( ७) अन्वये दंडात्मक कार्यवाही करणे नियमानुसार योग्य होणार नाही असे म्हटले आहे. याची सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी जगताप यांनी केली आहे.