लाळघोट्या हुजऱ्यांकडेच किती वर्षे पदे ठेवणार ?

कर्जत : प्रा. किरण जगताप

राजकीय पक्षांची तालुका, जिल्हा पातळीवरील पदे ही व्यक्तींना मान, प्रतिष्ठा, वलय निर्माण करून देणारी असतात. त्यामुळे पक्षातील नेतृत्वाला चिकटून राहत अशी पदे हस्तगत करण्यासाठी काही कार्यकर्त्यांची धडपड सुरु असते. पक्षातील ज्येष्ठता, नेतृत्व गुण, संघटन कौशल्य, वक्तृत्व असे विविध पाहून ही पदे निवडण्याचे साधारण निकष असतात. मात्र हल्ली ज्या पक्षात घराणेशाही आणि व्यक्ती केंद्रित नेतृत्व असते तेथे मात्र या कसोट्या पाळल्या जाताना दिसत नाहीत.

जो कार्यकर्ता निव्वळ हुजरेगिरी करत नेत्याचा उदोउदो करतो, स्वतःचे सामाजिक अस्तित्व गमावून लाचारीने राहतो, अशांनाच ही पदे वाटली जातात. पक्षात ज्या नेत्याची चलती असते तेथे ही मंडळी नेहमीच घुटमळत असते. पक्षाची ध्येयधोरणे आणि विचारधारा यावर काम करण्यापेक्षा लाचारीचा शॉर्ट फॉर्मुला वापरून ही पदे मिळवली जातात. मिळालेली पदे वर्षानुवर्षे आपल्याकडेच राहावीत यासाठी नेत्याजवळ राहून लाळघोटेपणा केला जातो.

या कार्यपद्धतीमुळे जनमानसात प्रतिमा असलेले स्वाभिमानी कार्यकर्ते हे पक्षांच्या पदापासून दूरच राहतात. कितीही निवडणुका लढवल्या, जिंकल्या तरीही त्यांच्या जनमताचा आदर पक्षाकडून केला जात नाही. ग्रामपंचायत सारख्या निवडणुकीत दारुण पराभव झालेले तालुका आणि जिल्ह्याची पदे घेऊन मिरवतात. नेत्याबरोबरच त्यांच्या आई-बाबांची, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय असलेल्या लोकांजवळ घुटमळत त्यांची हवी ती कामे करायची. बिनकामाचे मागे फिरत आज्ञाधारक असल्याचा आव आणायचा. नेत्याच्या नावाने पोस्टरबाजी करत स्वतःची प्रतिमा उजळून घ्यायची. हे फंडे आता नित्याचे झाले आहेत.

आभासी प्रतिमा निर्माण करण्यात ही मंडळी यशस्वी होत असल्याने नेताही मजबूर होतो. घुटमळणाऱ्या कार्यकर्त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे मोठे पडसाद उमटतील ? असे भासवले जात असल्याने पदांची निवड प्रक्रिया प्रतीक्षेतच राहते. त्यामुळे कौशल्यहीन कार्यकर्ते वर्षानुवर्षे पदाचा उपभोग घेत राहतात. नव्या पर्वातही नाठाळांनाच किंमत मिळते हे सामान्य कार्यकर्त्याचे दुर्दैवच. अशा परिस्थितीत अस्सल, निष्ठावंत कार्यकर्ते हे बाजूला राहणेच पसंत करत असतात. ही कोंडी फुटली नाही, तर एक खांबी नेतृत्व असलेल्या नेत्याच्या राजकीय कारकिर्दीलाच धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.