विखेंच्या चेल्याचपाट्यांना
सामान्य जनतेचा ‘राजकीय पदर’ तपासण्याची खोड

कर्जत : प्रा. किरण जगताप

आपल्याकडे लग्न ठरवताना ‘पदर’ जुळतो का ? हे पाहिले जाते. यामध्ये केवळ जातच नव्हे तर पोटजातसुद्धा जुळणे गरजेचे मानले जाते. हे अगदी जुळले की पुढील बोलाचाली करुन निर्णय घेतला जातो. काहीशा तशाच कार्यपद्धतीचा विखे यांच्या जवळच्या नेत्यांकडून अवलंब केला जात आहे. खा. डॉ. सुजय विखे हे मतदारसंघाकडे फिरकत नसल्यामुळे लोक आपली कामे घेऊन विखे यांच्या जवळचे नेते व प्रमुख कार्यकर्त्यांकडे जातात. हक्काच्या लोकप्रतिनिधींकडून आपले काम होईल, अशी लोकांची रास्त अपेक्षा असते.

भाग : २

मात्र काम घेवून गेलेल्या लोकांना या नेत्यांचे वेगळेच अनुभव येत आहेत. आलेला माणूस आपल्या गटाचा आहे का ? त्याने यापूर्वीच्या निवडणुकीत कोणाचे काम केले ? त्याचे वडील, भाऊ, चुलते व नातेवाईक राजकारणात कोणाला साथ देतात ? अशी राजकीय कुंडलीच त्यांच्याकडून पाहिली जाते. एकूणच त्याचा ‘राजकीय पदर’आपल्याशी जुळतो का ? हे पाहण्याचे उद्योग या मंडळींकडून केले जात आहेत. जर असे काहीच धागेदोरे जुळत नसतील तर काम होण्याची शक्यता धूसर होत असल्याचे लोकांना जाणवते. अनुभवलेले हे भयानक वास्तव आता लोक उघडपणे बोलू लागले आहेत.

खरे तर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर निवडलेला लोकप्रतिनिधी हा मतदारसंघातील सर्व जनतेचा बनत असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे काम पाहणाऱ्या तथाकथित नेत्यांनी लोकांचा राजकीय पक्ष, निवडणुकीत त्यांनी कोणाचे काम केले ? आता ते कोणत्या नेत्याला मानतात ? याची उठाठेव करण्याची गरज नसते. मात्र नसानसात राजकारण भिणलेल्या या नेत्यांमुळे मतदारसंघातील सामान्य जनतेचे हाल सुरु आहेत. आमची यंत्रणा ‘लय भारी’ म्हणून गाजावाजा करणाऱ्या या नेत्यांकडून विखेंची यंत्रणा फक्त जवळच्याच लोकांना योजना आणि सेवेचे लाभार्थी करण्यात गुंतलेली दिसत आहे.

मतदारसंघातील जनतेला खा. डॉ. सुजय विखे यांच्या स्वीय सहाय्यकांचाही अनुभव काही वेगळा नाही. त्यांनीही विखेंनंतर स्वतःचा एक कप्पा करून ठेवलेला दिसत आहे. मर्जीतल्या व नेहमी संपर्कात असलेल्या लोकांचेच फोन घ्यायचे, इतरांचे मात्र टाळायचे. या प्रकारामुळे आता लोकही त्रस्त झाले आहेत. खासदार साहेबांचे अपवादानेच मतदारसंघात दर्शन होत असल्याने लोक त्यांच्या संपर्क कार्यालयात अर्ज, निवेदने देतात. मात्र अर्ज देऊनही कित्येक अर्जांची दखल घेतली जात नसल्याने लोकांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नाही. ‘खासदार’ नावाच्या देवाचे दर्शनच घडत नसल्याने स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या ‘कासवा’जवळच कित्येक जण अडकून पडत आहेत. कर्जत तालुक्यात याची दाहकता अधिकच जाणवत आहे.मतदारसंघातील जनतेच्या या वाईट अवस्थेकडे लक्ष देऊन खा. डॉ. सुजय विखे हे कार्यपद्धतीत सुधारणा करतील काय ?