कुळधरण : भरत खराडे याच्याविरुद्ध ३ लाखांच्या मुरुम चोरीचा गुन्हा दाखल

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील भरत बापू खराडे याच्याविरुद्ध ३ लाख रुपये किंमतीचा मुरुम व माती चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुळधरण येथील गट नंबर ९१३/ ३ मधील मुरुम व माती जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलून नेल्याप्रकरणी शेतजमीन मालक रामचंद्र जगताप यांनी कलम ३७९ अन्वये कर्जत पोलिसात हा गुन्हा दाखल केला आहे.

जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे, १३ जुन रोजी सकाळी साडेदहा वाजता मी जमिनीमध्ये चक्कर मारण्यासाठी गेलो असता माझ्या गट नंबर ९१३/ ३ मधील मुरुम व माती माझ्या शेतजमीनी शेजारील भरत बापू खराडे हा जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलून त्याच्या गट नंबर ९१६/ १ मध्ये टाकत होता. त्यावेळी भांडण नको म्हणून मी त्याबाबत विचारणा केली नाही. मात्र या प्रकाराबाबत तहसीलदार, कर्जत यांना यावर कारवाई करण्याबाबत अर्ज दिला.

त्यानंतर तहसीलदार यांनी तलाठी, कुळधरण व मंडळाधिकारी, भांबोरा यांना आदेश देऊन याबाबतचा अहवाल सादर करण्याचे कळविले. त्यानंतर तलाठी व मंडळाधिकारी यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्राची पाहणी करून या शेतजमिनीत उत्खनन झाल्याचे अहवालात नमूद केले. याप्रकरणी जगताप यांनी ५०० ब्रास मुरूम व माती ६०० रुपये प्रति ब्रास किमतीप्रमाणे ३ लाख रुपये किमतीचा मुरूम भरत खराडे याने चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला.

१५ डिसेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र वाघ यांनी उत्खनन झालेल्या ठिकाणी येवून पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत.