तहसीलदार साहेब, तुमच्या शेतातला मुरुम उचलला असता तर काय केले असते ?

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील रामचंद्र जगताप यांच्या गट क्रमांक ९१३ मधील सुमारे ५०० ब्रास मुरुम व माती विनापरवाना उत्खनन करून नेण्यात आला. शेजारी जमीन असलेल्या भरत बापू खराडे यांनी जेसीबी, पोकलेन मशिन लावून हायवाद्वारे त्याची वाहतूक करून मुरुम व माती त्यांच्या शेतात टाकली. याबाबत कर्जतच्या तहसीलदारांकडे वाहन क्रमांकासह लेखी तक्रार केली. मात्र महसूल विभागाने या उत्खननाचा २ महिने उलटले तरी पंचनामा केला नाही. शेतकऱ्याने अखेर २८ ऑगस्ट रोजी उपोषण व निषेध आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून केला.

शेतातील मुरूम व मातीचे उत्खनन केल्याने शेताचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील यादव यांनी कुळधरण येथे येवून उत्खननाची पाहणी केली. महसूल विभागाने २ महिने उलटूनही पंचनामा न केल्याने यादव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. उत्खनन ठिकाणी व्हिडिओ काढून त्यांनी महसूल विभागाचे वाभाडे काढले.

लेखी तक्रार देवूनही उत्खननाचा पंचनामा न झाल्याने यादव यांनी तहसीलदार यांना थेट सवाल विचारले. तुमच्या शेतातील माती व उचलला असता तर तुम्ही काय केले असते ? असे विचारत महसूल विभागातील लोक काम करण्यासाठी लाच घेत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्याने तहसीलदार गणेश जगदाळे, नायब तहसीलदार कारंडे यांच्याकडे पाठपुरावा करूनही त्यांनी दाद दिली नसल्याने अखेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. २८ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाणार आहे.