कर्जतमध्ये १२ गॅस टाक्यांचा स्फोट ; दोघे गंभीर जखमी

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत शहराजवळ बर्गेवाडी मार्गालगत सोमवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास १२ गॅस टाक्यांचा स्फोट झाला. पाच फुट अंतरावर असलेल्या भारत गॅस गोडाऊनमध्ये व आवारात शेकडो गॅसच्या टाक्या होत्या. या दुर्घटनेत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत.

हा स्फोट एवढा प्रचंड होता की दूरवरून आगीचे लोळ दिसत होते. गॅस टाक्या फूटल्याचे आवाज दूरपर्यंत ऐकायला येत होते. ही दुर्घटना घडताच काही नागरिकांनी व नगरपंचायतच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. या स्फोटातून उडालेल्या टाक्या दूरवर उडून पडल्याचे पहावयास मिळाले.

या घटनेनंतर पोलीस व महसूल विभागाने पंचनामा केला. मात्र तेथे असलेल्या हजारो टाक्या जप्त का केल्या गेल्या नाही ? याचे उत्तर प्रशासनाकडून मिळू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन उत्तम लोंढे यांच्या राहत्या घराशेजारील पोल्ट्रीफार्ममध्ये रात्री भारत गॅस गोडाऊन शेजारी हयगयीने गॅस टाक्यांची हाताळणी केल्याने त्याठिकाणी आग लागली. या आगीमध्ये १२ पुर्ण जळालेल्या गॅस टाक्या, २ लहान जळालेल्या गॅस टाक्या, ५ सिलेंडर या स्फोटामध्ये जळाल्या. याशिवाय पोल्ट्रीच्या बाहेर ३ एचपी कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्या, ४ इलेक्ट्रीक मोटार जळालेल्या अवस्थेत, एक जळालेला स्टोव्ह व इतर संसारोपयोगी साहित्य, जळालेल्या अवस्थेतील गहू, स्कुटी गाडी असे बरेचसे साहित्य जळून खाक झाले.

आरोपींनी त्यांचे कुटुंबातील सदस्यांचे व परीसरातील नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण होवून होणा-या जिवित व वित्तहाणीस जबाबदार होवू शकतो याची त्यांना पुर्ण कल्पना असतानाही हे कृत्य केल्याच्या फिर्यादीवरून सचिन उत्तम लोंढे रा. बर्गेवाडी व वैभव निकत रा. आंबीजळगाव या दोघांवर भादवि कलम ४३६,२८६,३३७, ३३८, ३४ प्रमाणे कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक मारुती मुळुक यांनी दिली.

घटनेनंतर पोलीस व महसूल प्रशासनाने शेजारी असलेल्या भारत गॅसच्या गोडाऊनचा व समोर उभ्या असलेल्या अनेक गाड्या ज्यामध्ये गॅस टाक्या भरलेल्या होत्या त्याचा पंचनामा केला. गोडाऊनमध्ये असलेल्या टाक्या तेथील कर्मचाऱ्यांनी उचलून दाखवून मोकळ्या असल्याचे दाखवले, परंतु गोडाऊनसमोर उभ्या असलेल्या गाड्यामध्ये असलेल्या टाक्या मात्र मोकळ्या होत्या की भरलेल्या याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

कर्जत येथे भारत गॅसची अधिकृत एजन्सी नाही तरीही भारत गॅसच्या बावर एन्टरप्रायजेसच्या गोडाऊनमध्ये हजारो टाक्या ठेवण्यास परवानगी आहे का? हे तपासून पंचनामा केल्यानंतर मुद्देमाल जप्त करणे आवश्यक असताना महसूल विभागाने मात्र या टाक्या जप्त का केल्या नाहीत. याबाबत प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार गुरू बिराजदार व नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगुळे यांना पत्रकारांनी माहिती विचारली. मात्र त्यांनी मुद्देमाल जप्त केला नसल्याची माहिती देत अधिक माहिती देण्याचे टाळले. यामुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

कर्जतमध्ये भारत गॅसच्या गोडाऊन शेजारी दोन- पाच फुटांवर आग लागलेली असताना भारत गॅसच्या आवारात हजारो मोकळ्या टाक्या ठेवलेल्या होत्या, या गॅस टाक्या मोकळ्या होत्या तर त्या तातडीने विविध गाड्यामध्ये भरून तेथून हलविण्याची घाई काही युवकांनी का केली ? टाक्या कर्जत येथील गॅस गोडाऊनमध्ये ठेवण्यास परवानगी आहे का ? पंचनामा केलेला मुद्देमाल जप्त का करण्यात आला नाही ? असे अनेक प्रश्न निरुत्तर राहत आहेत.