आ. राम शिंदे यांनी जनतेचा पैसा लुटण्याचे काम केले

कर्जत : प्रा. किरण जगताप

आठ खात्याचे मंत्री असून ज्या माजी मंत्री राम शिंदे यांना कधी सीएसआर फंड आणता नाही आला. ज्यांना कधी दहा वर्षाच्या काळात पदरच्या खिशातून जनतेसाठी कर्जत- जामखेडच्या मतदारांसाठी एक टँकर लावता आला नाही. जनतेचा कधी विचार केला नाही. मतदारसंघातील नागरिकांना, मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या गुराढोरांना, पाणी मिळत आहे की नाही ? हे कधी राम शिंदे यांनी पाहिले नाही. उलट आमदार असताना आणि मंत्री असताना कार्यकर्त्याच्या नावावर शासकीय टँकरचे पाणीपुरवठा टेंडर घेऊन त्याच्यात मात्र मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचे काम राम शिंदे यांनी केलेले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत शहर कार्याध्यक्ष भूषण ढेरे यांनी केला आहे.

ढेरे यांनी पुढे म्हटले आहे, शिंदे यांनी स्वतःच्या खिशातून तर कधीच एक रुपया मतदारसंघासाठी खर्च केला नाही. परंतु मतदारसंघाच्या नावाखाली स्वतःचा खिसा भरण्याचे काम मात्र त्यांनी केले. ज्यांच्या नावावर केंद्र घेतले होते, त्यांनी जनतेचा पैसा लुटण्याचे काम केलेले आहे. ज्या गावांमध्ये दिवसाला दोन टँकरच्या खेपा टाकणे गरजेचे असायचे, त्या ठिकाणी एकच खेप टाकायची, अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी टँकरमध्ये घोटाळा केलेला आहे. यामुळे राम शिंदे व राम शिंदे यांच्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना रोहित पवारांवर बोलण्याचा अधिकार नाही. आ. रोहितदादा पवार यांनी कर्जत जामखेड तसेच महाराष्ट्रातील अनेक वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मोफत पाणी वाटप करण्याचे काम केलेले आहे. अगोदर आणि आमदार झाल्यानंतरही दरवर्षी कर्जत- जामखेडमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केलेला आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या गुराढोरांसाठीही यामुळे एक सुखद बाब म्हणून याकडे शेतकरी पाहत असतात. पप्पू धोदाड यांनी आपला आवाका पाहून बोलावे आणि खरे बोलावे. खोटे बोल पण रेटून बोल असे करू नये, असेही ढेरे यांनी म्हटले आहे.