‘या’ गावांच्या हद्दीत होणार कर्जत एमआयडीसी !

कर्जत : प्रा. किरण जगताप

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी त्यांच्या दालनात आ. प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. नियोजित एमआयडीसीसाठी कोंभळी, रवळगाव, थेरगाव या गावांच्या हद्दीतील जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. साधारणतः ४०० हेक्टर कोरडवाहू जमीन याठिकाणी उपलब्ध आहे. नगर- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जवळच आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे. २५० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यामुळे महामंडळाचे जॉईट सीईओ भंडारी हे जमिनीबाबतचा भूअहवाल सादर करणार आहेत आणि तो अहवाल हाय पॉवर कमिटीपुढे सादर होणार आहे. जागेबाबत मंत्री महोदय आणि सर्व अधिकारी याच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली. पुढील प्रक्रिया थोड्याच कालावधीत पूर्ण होईल. हा अवर्षण प्रवण भाग आहे. त्यामुळे येथे कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आता या ठिकाणी औद्योगिक वसाहत होताना या भागाचा निश्चित कायापालट होणार असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे आ. प्रा. राम शिंदे यांनी दिली.

या भागात एमआयडीसी व्हावी म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, काकासाहेब तापकीर हे आग्रही होते. त्यांनी यासाठी जागा सुचवली होती. तीच जागा आता प्रस्तावित एमआयडीसीसाठी होत आहे. या जागेची निवड म्हणजे आ. प्रा राम शिंदे यांनी शाश्वत विकासाची गंगा या अवर्षण प्रवण भागात आणून या भागातील जनतेवर उपकार केलेले आहेत. अल्पभूधारक त्यातही कोरडवाहू, दुष्काळ नेहमीचाच, शेतीसाठी पाणी येण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत औद्योगिक वसाहत उभी राहण्याने या भागाचा विकास होणार आहे. मिरजगाव बाजारपेठ म्हणून विकसित होणार आहे. जवळच मराठवाडा हद्द आहे त्यांनाही याचा लाभ होणार आहे. या अवर्षण प्रवण भागात एमआयडीसी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानण्यात आले आहेत. या बैठकीसाठी शेखर खरमरे, काकासाहेब तापकीर, सचिन पोटरे, पप्पूशेठ धोदाड, गणेश क्षीरसागर, महेश तनपुरे, तात्यासाहेब खेडकर, शहाजीराजे भोसले, धनंजय मोरे पाटील, दत्ता मुळे, नंदकुमार नवले, गणेश पालवे, राहुल गांगर्डे, नंदलाल काळदाते, शरद म्हेत्रे, काका ढेरे, बजरंग कदम आदी उपस्थित होते.