नगरसेवक नामदेव राऊत यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

कर्जत : प्रा. किरण जगताप

नगरसेवक नामदेव राऊत यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत नगरपंचायतीत लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या नयना रविकांत कुंभार, वय- २८ वर्षे, रा. २१ एकर, कर्जत यांनी बुधवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मी माझ्या कार्यालयामध्ये कामकाज करत असताना तेथे नामदेव चंद्रकांत राऊत, रा. कर्जत हे आले. ते मला म्हणाले की, मी जे सांगेल तेच करायचे, कायदेशीर बेकायदेशीर काही संबंध नाही. मी सांगेल तीच पुर्व दिशा. त्यावर मी त्यांना म्हणाले, कुठलीही बिले बेकायदेशीरपणे काढली जाणार नाहीत. त्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी मला घाण घाण शिवीगाळ व दमदाटी करुन मी करत असलेल्या सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करुन मला चापटाने मारहाण केली.

माझ्या उजव्या हाताला धरुन मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मी कामकाज करीत असलेल्या टेबलपासून मला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी कोणाला फोन करु नये व रेकॉर्डीग करु नये म्हणुन माझा फोन हिसकावून घेवून फोडला. त्यावेळी भाऊसाहेब तोरडमल यांनी माझी सोडवा सोडव केली. त्यानंतर नामदेव राऊत मला म्हणाले, रस्त्यात तू दिस, तुला मारुन टाकीन. माझ्यावर अगोदरच २१ केसेस आहे एक वाढली तर काय झाले, तुझा गेमच करतो, अशी जिवे मारण्याची धमकी दिली.

तुला कर्जतमध्ये काम करु देणार नाही तसेच तुझी बदनामी करतो म्हणजे तू येथून निघून जाशील, असे म्हणत ते नगरपंचायत कार्यालयातून निघून गेले. त्यावेळेस तेथे कार्यालयीन कर्मचारी तसेच कामकाजासाठी आलेले इतर नागरिक उपस्थित होते. त्यानंतर मी अहमदनगरमधील जिल्हाधिकारी कार्यालय येथे जावून या घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली व कर्जत पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. कलम ३५३, ३५४, ४२७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे हे करत आहेत.