स्वतःच्या अपयशाचे खापर जनतेवर फोडत जनतेचे हिर का भाजता ?

कर्जत : प्रा. किरण जगताप

स्वतःच्या अपयशाचे खापर जनतेवर फोडत कर्जत- जामखेडमधील जनतेचे हिर का भाजता? असा सवाल आ. प्रा. राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांचा नामोल्लेख टाळत विचारला. एमआयडीसीला तत्वतः मंजूरी मिळाल्याची अधिसूचना निघाली म्हणून नागरिकांनी मिरजगाव येथे लाडू वाटून आनंद व्यक्त केला. त्यावेळी आ. शिंदे यांना नागरिकांनी लाडू भरवत त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी ते बोलत होते.

एमआयडीसी संदर्भात आ. रोहित पवार व कार्यकर्त्यांनी जोरदार टीका केली. आ .राम शिंदे यांना उद्योगातील काही समजत नाही, आम्ही उद्योग चालवतो, त्यांनी गुऱ्हाळ तरी चालू केले का? एमआयडीसी मीच करणार ! अशी टीका करण्यात आली होती. यावर आ. राम शिंदे म्हणाले, दोन महिन्याच्या कालावधीत आपण १२०० एकर प्रस्तावित जागेसाठी तत्वतः मान्यता मिळवली, त्यामुळे लोकप्रतिनिधी अस्वस्थ आहेत. औद्योगिक वसाहतीचा सदोष प्रस्ताव शासनाने नाकारला तरी कर्जत ?, शासनाने आता कोंभळी येथील जागेसाठी तत्वतः मंजुरी दिली तरी कर्जत ?, कोणावर ईडीची कारवाई झाली तरी कर्जत ? कर्जत बंद करणाऱ्या बंद बहाद्दरांनी कन्नड साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केल्यावर कर्जत बंद का केले नाही ? असा सवालही आ. राम शिंदे यांनी उपस्थित केला.

वालवड सुतगिरणी संदर्भातील टीकेला उत्तर देताना आ. शिंदे म्हणाले, सुतगिरणी सहकारी तत्वावर होती, भूमिपूजनाच्या वेळेस मी आवर्जून सांगितले होते. त्याचे व्हिडिओ आजही पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत. विरोधकांनी खातरजमा करावी. शासनाने या सहकारी सुतगिरणीसाठी १० कोटी रुपये दिले होते. असे असताना मुख्य प्रवर्तक श्री गुगळे यांनी ती बंद का केली? त्यांना मविआ सरकार आल्यावर कोणी त्रास दिला? याची योग्य व्यासपीठावर पोलखोल निश्चित करणार आहे असे म्हणत महाराष्ट्र रोजगार हमी विहिरीच्या चौकशीसाठी कोणी दबाव आणला ? माहिती कागदपत्रासहित जनतेपुढे मांडू असेही आ. राम शिंदे म्हणाले.

मोफत पाणी पुरवठा करण्याचे नाटक सेवाभावी संस्था पुढे करत करायचे आणि झेपत नाही म्हणून शासनाकडे परवानगीची नाटके करत बंद करायचे, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही पाणी वाटत होतात निवडणूक असूनही कधी प्रतिबंध केला नाही, मग आता कशासाठी करायचा? तुमच्या राजकारणासाठी जनतेला तुम्ही वेठीस धरू नका. तुम्ही जनतेला मोफत पाणी देऊ शकत नाही, फक्त देण्याचे नाटक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करता. आता त्याचा फारसा उपयोग होणार नाही, हे तुमच्या लक्षात आल्यामुळे परवानगीचे नाटक करत तुम्ही ते बंद केले आहे. कर्जत- जामखेडमधील जनतेचे हिर का भाजता? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला.

आ. शिंदे म्हणाले, एमआयडीसी इतक्या कमी कालावधीत मंजूर होणे हेच मुळात विरोधकांच्या पचनी पडलेले नाही. त्यातही एमआयडीसीसाठी जागा लोकांनी निवडलेली आहे. अवर्षण प्रवण भागातील जनतेसाठी हा एक मोठा दूरगामी परिणाम करणारा निर्णय होणार आहे. त्यामुळे विरोधक सैरभैर झाले आहेत. त्यांना फक्त व्यवहार कळतो. कोणाचे तरी आर्थिक हितसंबंध जपताना जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे त्यांचे धोरण आहे. आमदार आणि मविआ सत्तास्थानी असण्याच्या काळात कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक त्यांच्याकडून झालेली नाही त्यामुळे ते उद्विग्न अवस्थेत असून बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानत आहेत असे शिंदे म्हणाले.

यावेळी काकासाहेब तापकीर, शेखर खरमरे, अशोक खेडकर, अमृत लिंगडे, प्रशांत बुद्धिवंत, नितीन खेतमाळस, डॉ. रमेशचंद्र झरकर, संदिप बुद्धिवंत, संपत बावडकर, लहू वतारे, नंदू नवले, तात्या खेडकर, दत्ता मुळे, काशिश्वर बुद्धिवंत, संतोष कोरडे, कैलास बोरुडे, सारंग घोडेस्वार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.