नगराध्यक्षांच्या पुत्राचा स्वागत समारंभ सामाजिक उपक्रमांनी साजरा

कर्जत : प्रा. किरण जगताप

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत व अक्षय राऊत यांच्या पुत्राचा स्वागत समारंभ शुक्रवारी सायंकाळी माळेगल्ली येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी कर्जत शहरातील महिला, बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांना २६ जानेवारी रोजी पुत्ररत्न झाले. तेव्हापासून बाळ मामाच्या ( म्हेत्रे मळा) घरीच होते. शुक्रवारी ते माळेगल्लीतील घरी आले. तेव्हा राऊत परिवाराच्या वतीने बाळाच्या स्वागत समारंभाचे आयोजन केले. माळेगल्ली येथील घरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच अंगणात फुलांचा सडा टाकण्यात आला होता. नगराध्यक्षा उषा राऊत व त्यांचे पती अक्षय राऊत व बाळाचे सजवलेल्या चारचाकी गाडीने घरी आगमन झाले. यावेळी चंद्रकांत राऊत व भामाबाई राऊत यांनी बाळाचे स्वागत केले.

या निमित्ताने राऊत परिवाराच्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत येथील स्नेहप्रेम या अनाथ मुलांच्या आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. कर्जत नगरपंचायतीच्या सफाई कामगार महिलांना साडयांचे वाटप करण्यात आले. भागवत धर्म सेवा मंडळ संचलित निमगाव डाकू येथील गो शाळेतील गाईंना चारा खरेदीसाठी ५ हजार रुपयांचे सहाय्य करण्यात आले. गेल्या साडेतीन वर्षांपासून कर्जत शहरात स्वच्छता अभियान राबवत असलेल्या व वृक्षारोपण करत असलेल्या विविध सामाजिक संघटनेला २१ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले.

विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अशोक नेवसे, गोशाळेच्या वतीने तात्यासाहेब क्षीरसागर तर स्नेहप्रेम संस्थेच्या वतीने फारूक बेग यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेवराव राऊत, कर्जत नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले, नगरसेविका प्रतिभाताई भैलुमे, मोनाली तोटे, ज्योती शेळके, छाया शेलार, हर्षदा काळदाते, राणी गदादे, निता कचरे, मंगल तोरडमल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी राऊत यांनी केले. सुत्रसंचालन स्वाती पाटील यांनी केले. भारती राऊत यांनी आभार मानले. बाळाच्या स्वागत समारंभाच्या नियोजन बद्ध आयोजनाबाबत उपस्थितांनी राऊत परिवाराचे कौतुक केले.