मोफत पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली सीएसआर फंडातून धंदा

कर्जत : प्रा. किरण जगताप

आम्ही कर्जतमध्ये पाणी पुरवठा करतो आम्हाला शासनाने परवानगी द्यावी, असा अर्ज प्रशासनाकडे तथाकथित खासगी टॅकरने विनामूल्य पाणी पुरवण्याचे नाटक करणाऱ्या संस्थेने केला. त्याला प्रशासनाने हरकत घेतली आणि नेहमीप्रमाणे आमचे मोफत पाण्याचे टॅकर बंद केले अशी आवई आमदारांच्या कार्यकर्त्यांनी उठवली. त्याची वस्तुस्थिती वेगळीच आहे. तुम्हाला सेवा भावी वृतीने मोफत पाणी पुरवठा करायला कोणीही आडकाठी केली नाही, परंतु तुम्हाला मोफत पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली त्या संस्थेला कंपन्यांचे सीएसआर फंड मिळवून धंदा करायचा होता का? असा प्रश्न भाजपाचे तालुका सरचिटणीस पप्पूशेठ धोदाड यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे, लोकांची दिशाभूल करायची आणि प्रत्येक बाबतीत व्यवहार पहायचा, नफ्या तोट्याची गणिते मांडायची त्यातून कर्जत- जामखेडच्या सर्वसामान्य माणसाला भावनिक साद घालण्याचा वांझोटा उद्योग लोक प्रतिनिधी किती दिवस करणार आहेत. त्यातूनच मग आमदार प्रा. राम शिंदे यांच्यावर शरदचंद्र पवार गटाचे चौथ्या- पाचव्या फळीतील काही लोक चिखलफेक करत आहेत. वैचारीक मतभेद ही लोकशाहीतील प्रक्रिया आहे. पण विनाकारण चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या नेतृत्वाच्या बदनामीसाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी केलेल्या बेछूट आरोपातून सामान्य जनतेचे ह्रदय विदीर्ण करणारी घटना होत आहे. आ. प्रा. राम शिंदे यांची बदनामी व जनतेची दिशाभूल केली जात आहे.

खरे तर ज्या कर्जत – जामखेड तालुक्यात डिसेंबर- जानेवारीपासून पाणी टँकर मागणीचे प्रस्ताव प्रलंबित असायचे, त्या कर्जत – जामखेड मतदारसंघात प्रा. राम शिंदे जलसंधारण मंत्री झाल्यानंतर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलक्रांतीची बीजे रोवली गेली, प्रत्येक गावागावात नाला खोलीकरण, सीसीटी, डीप सीसीटी, बंधारे, गॅबियन बंधाऱ्याच्या माध्यमातून दुष्काळ निवारण आणि पाणलोट व्यवस्थापनाचे भरीव काम करण्यात आले आणि म्हणून प्रा. राम शिंदे यांना पाणीदार नामदार म्हणून संबोधले जाऊ लागले हे सर्वश्रुत आहे. त्यानंतर टँकर मागणीचा एकही प्रस्ताव आल्याचे कधीही आढळले नाही मात्र राजकीय इरशेला पेटलेल्या रोहित पवार यांच्या कडून पाण्याच्या टँकरचे राजकारण वारंवार करण्यात आले.

आदर्श आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. म्हणून जर समाजोपयोगी भावनेतून आणि स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून स्वतःच्या जाहिरातीशिवाय पाणी वाटप केल्यास प्रशासनाचाही अडसर ठरू शकत नाही ही एवढी सोपी प्रक्रिया आहे. पण प्रसिद्धी च्या हव्यासाने झपाटलेल्या लोकप्रतिनिधींना आचारसंहिता, प्रशासन, या गोष्टी माहीत काय ? काही झाले की प्रा. राम शिंदे, काही झाल की राम शिंदे आणि खालच्या पातळीवर टीका करणे या पलीकडे काही जमलच नाही. आमदार पवार मतदारसंघातील जनतेला कर्णाच्या दातृत्वाचा भाव दाखवत असताना प्रत्येक वेळी पाण्याच्या टँकरवरच येऊन का ठेपता आहात. ठोस विकासात्मक काम गेल्या पाच वर्षात आपणाला का करता आले नाही ? जे मुद्दे घेऊन आपण या भूमीमध्ये पाय ठेवले त्याच काय झालं ? पुन्हा पाण्याच्या टँकरच मखमली गाजर आणि मुरमुऱ्याच लाडू सामान्य जनतेला दाखवायची वेळ का आली ? पाच वर्षाच्या कार्यकाळात कधीही लोकांना पाण्याच्या टँकरची आवश्यकता भासली नाही का ? निवडणुकीच्या कार्यकाळातच लोकांना फक्त तहान लागते का? प्रा. राम शिंदे यांनी खालच्या पातळीचं आणि घाणेरड राजकारण यापूर्वीही कधी केलं नाही आणि यापुढेही कधी करणार नाहीत.

राज्याच्या राजकारणातील एक अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं नेहमी सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय त्यांच्याकडून घेतले गेलेले आहेत. प्रा राम शिंदे यांनी चांगल्या घेतलेल्या निर्णयाला उलट पक्षी आपणच खोडा घालण्याचं काम यापूर्वीही केल्याचे दिसून येत कोरोना महामारीच्या कार्यकाळात सामान्य लोकांसाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय प्रा. राम शिंदे यांनी घेतला होता. कर्जत जामखेड मतदार संघातील रेशनधारकांची सर्व रक्कम आमदार प्रा. राम शिंदे यांनी भरली होती. मात्र आचारसंहिता नसतानाही सामान्य जनतेच्या अन्नात माती कालवण्याचे पाप त्या वेळेस कोणी केले या आणि अश्या अनेक घटनांचे साक्षीदार मतदार संघातील जनता आहे. प्रा.राम शिंदे यांनी कधीही कलोह करण्याचा प्रयत्न केला नाही उलट पक्षी याकडे त्यांनी दुर्लक्ष करून आपला सरळ मार्गक्रम त्यांनी चालूच ठेवला. म्हणून लोकांच्या हितासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी अहोरात्र झटणारा नेता म्हणून लौकिक प्रा. राम शिंदे यांचा राज्यभर निर्माण झाला. या पुढील काळात प्रा. राम शिंदे यांची विनाकारण केलेली बदनामी खपवून घेतली जाणार नाही. कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी अश्या लोकांवर कायदेशीर कारवाई करणार.

हिंदीमध्ये एक म्हण आहे. “जहॉ का राजा व्यापारी” वहाॅंकी प्रजा भिकारी”. याच धोरणानुसार आपला राजकीय प्रवास चालू आहे. प्रत्येक राजकीय निर्णय प्रक्रियेत स्वतःच्या नफ्या तोट्याचा हिशोब करून आपण राजकीय निर्णय घेत आहात मग तो औद्योगिक विकास महामंडळ निर्मिती असो अथवा कुकडी प्रकल्पातील पाणी असो तुमचा हिशोब जुळला तरच काम प्रगतीपथावर जात आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या समाज विघातक वृत्तीला कुठेतरी लगाम लागावा ही सामान्य जनतेची इच्छा आहे. आणि त्यास अनुसरून प्रा.राम शिंदे यांनी औद्योगिक वसाहत निर्माण करताना संपूर्ण तालुक्यातील जनतेला जाहीररित्या आव्हान करून जागा सुचवण्यात सांगितले आणि त्यानुसार संपूर्ण तालुक्यातील जनतेच्या हाताने जागा निवडी पासून ची प्रक्रिया पार पाडल्याची दिसून येते. कुठल्याही प्रकारे मतलबाने बरबटलेल्या वृत्तीतून औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आली नाही. आणि म्हणून खंडाळा येथील एमआयडीसी निर्मितीतून कमाईचा तुमचा हिशोब चुकल्याचे शल्य तुम्हाला बोचते आहे हे सर्व सामान्य जनता ओळखू शकते, असेही धोदाड यांनी म्हटले आहे.